हरिपाठ

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवून या ॥१॥ तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥

॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥

॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥

/p>

॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

॥ पाच ॥ योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥

॥ सहा ॥ साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं |4|

॥ सात ॥ पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

॥ आठ ॥ संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

॥ न‌ऊ ॥ विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री संजीवनी समाध्या विषयी माहिती